सिल्लोड, (प्रतिनिधी): सद्या नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजत आहे. या अधिवेशनात सिल्लोड - सोयगाव विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्न म्हणजेच वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतमालाचे नुकसान व होणारे हल्ले याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
ज्या ठिकाणी वन विभागाची जागा आहेत त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची येण्याची शक्यता जास्त आहे त्याठिकाणी वन विभागाच्या जागेची सीमा निश्चित करून तेथे मनरेगा अंतर्गत चर खोदावे यातून जीवितहानी तसेच शेतीपकाचे नुकसान होणार नाही यासाठी राज्य सरकारने
शाश्वत उपयोजना कराव्यात यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली.
बिबट्याचा मुक्त वावर पाहता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या येऊन गेला ते तपासून पिंजरे लावू, असे वन विभागाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे बिबट्या बाबत निर्माण झालेली भीती पाहता व याबाबत गंभीरपणे विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांना आवश्यक तेथे किंवा शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजरे लावण्यासाठी आदेशीत करावे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
या लक्षवेधी सूचनांवर उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, वन विभागाच्या सीमेवर शासन सात फूट रुंद बांबूची लागवड करीत आहे. आवश्यकता भासल्यास चर देखील खोदु, बिबट्या बाबत निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी विशेष खबरदारी घेवू, आमदार महोदयांनी मागणी केली. तेथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावू अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी या वेळी दिली.














